नांदेड : आरोग्य, शेती, शिक्षणासोबतच माहिती आणि मनोरंजनात आकाशवाणी केंद्राने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. आदिवासी भागात आकाशवाणी हे सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे. असे असताना देखील अद्याप हिंगोली जिल्ह्यात स्वतंत्र एफएम केंद्र नव्हते. हिंगोली लोकसभा मतदारसंघात आदिवासी भाग येत असल्याने जिल्ह्याची माहिती, मनोरंजन, शिक्षणाची भुक भागवण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा लोकसभेत हिंगोली जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून गेलेले हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी स्वंतत्र एफएम केंद्राची सभागृहात मागणी केली होती. या मागणी सभागृहात नुकतीच मंजुर मिळाली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या अधिवेशनात हिंगोली लोकसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र एफएम केंद्र उभारण्यात यावे, म्हणून सभागृहात लक्षवेधी मागणी करताना हिंगोली जिल्हा हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत माहिती, मनोरंजन, शेती, शिक्षणात मागास असल्याचे म्हटले होते. हिंगोली जिल्ह्यात स्वतंत्र एफएम केंद्र सुरु झाल्यास जिल्ह्यातील जनतेच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील व माहिती मनोरंजनासोबतच शेती, पर्यावरण, आरोग्याबद्दलची माहिती मनोरंजनाच्या माध्यमातून मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
हेही वाचा - टिईटीच्या परीक्षेत परीक्षा परिषदच नापास !
असे आहे मतदारसंघाचे क्षेत्रफळ
हिंगोली जिल्हा हा विदर्भाच्या सिमेला लागुन आहे. या लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्रफळ ४६० किलोमीटरचे इतके आहे. लोकसभा मतदारसंघात ११ तालुक्यांचा समावेश आहे. अशा या जिल्ह्यात केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने मंजुरी दिली असून, शंभर वॅटचे एफएम केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याची प्राथमिक स्वरूपात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक असलेली फ्रीक्वेन्सीची चाचपणी लवकरच करण्यात येणार आहे. तर ऑक्टोबर २०२० अखेर काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा -‘चंद्रलोक’ मध्ये मात्तबरांचे गुप्तगू !
देशभरात शंभर एफएम केंद्राला मंजुरी
आकाशवाणीचे रेडीओ हे माहिती व मनोरंजनाचे सर्वात प्रभावी माध्यम असले तरी, खेडोपाडी दुर्गम भागात हे माध्यम पोहचलेले नाही. एकंदरीत शासनाच्या माहितीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने देशभरात सुमारे शंभर ठिकाणी नवीन एफएम केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात शिर्डी, वाशिम, सिरोंचा, सटाणा, नंदुरबार, अहेरी, चिपळूण, अचलपूर या ठिकाणी सुद्धा एफएम केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी लागणारा निधी येत्या अर्थसंकल्पात मंजूर केला जाणार आहे.
विकासासाठी संसदेत विविध मागण्या केल्या
टीव्ही, मोबाईल बघण्यासाठी व ऐकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. यामुळे कामात देखील अडथळा येतो. तसा अडथळा रेडीओ ऐकण्यासाठी येत नाही. त्यासाठी वेळ देण्याची गरज नाही. शेतात कुठेही एफएम ऐकता येते. हिंगोली मतदारसंघात एकही एफएम केंद्र नव्हते. यासाठी सभागहात लक्षवेधी मागणी केली होती. ती मंजुर झाली. जिल्ह्याच्या विकासासाठी संसदेत रेल्वे, उद्योग, पीकविमा, हळद प्रक्रिया उद्योग, नुकसान भरपाईची वाढीव मागणी केली आहे. त्याला यश येणे बाकी आहे. -हेमंत पाटील, खासदार.
|